महापालिका वाचनालयाचे पुनरुज्जीवन होणार..!

परभणी - मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालयाच्या पुनरुज्जीवनाकरिता महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मध्यवस्तीत कार्यरत असलेले महापालिकेचे मौलाना अबुल कलाम आझाद हे वाचनालय "अ' वर्ग दर्जाचे आहे; परंतु नगरपालिकेपाठोपाठ महापालिका प्रशासनाकडून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या वाचनालयावर गेल्या चार-सहा वर्षांपासून मोठी अवकळा पसरली आहे. विशेषतः या वाचनालयातील बहुतांशी मराठी, हिंदी, उर्दू ग्रंथ जीर्ण अवस्थेत आहेत. तर काही ग्रंथ गायब झाले आहेत; तसेच वाचनालयात फर्निचरची मोडतोड झाली आहे.

वाचनालयाचे पूर्वी चार हजारांहून अधिक सभासद होते. विशेषतः पाचशे वाचक नियमितपणे सकाळ व सायंकाळी वाचनालयात हजेरी लावत; परंतु मागील दोन-चार वर्षांपासून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे वाचनालय बंद अवस्थेत होते. परिणामी, मराठी, उर्दू, हिंदी व इंग्रजी भाषेतील कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, काव्यसंग्रह, नाटके, बालसाहित्य तसेच इतर वाचनीय साहित्य अडगळीस पडले आहे.
दरम्यान, या वाचनालयाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापौर प्रताप देशमुख व आयुक्त सुधीर शंभरकर यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः संबंधित विभागाकडून या वाचनालयाच्या सद्यःस्थितीचा अहवाल मागवून घेतला. त्या आधारे वाचनालयाच्या पुनरुज्जीवनाकरिता काय करता येईल, या दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार विनिमय सुरू आहे. महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत वाचनालयाच्या पुनरुज्जीवनासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास सभेने मंजुरी दिली. त्यामुळे या वाचनालयाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या वाचनालयाची ग्रंथसंपदा नोंदणीनुसार 41 हजार 498 एवढी आहे. मराठी भाषेतील ग्रंथसंपदा 23 हजार 382, उर्दू भाषेतील नऊ हजार 367, हिंदी भाषेतील दोन हजार 372, इंग्रजी भाषेतील ग्रंथसंख्या एक हजार 377 एवढी आहे. बहुतांशी ग्रंथ चांगल्या अवस्थेत असून, वाचनालयातील फर्निचर दुरुस्तीकरिता प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच नवीन खुर्च्यांच्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालयासाठी टेबल, कपाट, लोखंडी रॅक, कॅटलॉग कॅबिनेट तसेच नियतकालिकांसाठी रॅक वगैरेंचीही दुरुस्ती केली जाणार आहे.

ग्रंथ खरेदी होणार
"अ' वर्ग दर्जाप्राप्त वाचनालयात 2008-09 या आर्थिक वर्षात अखेरची ग्रंथ खरेदी झाली. त्यावर दोन लाख दोन हजार 623 रुपये एवढा खर्च झाला होता. मराठी भाषेतील ग्रंथखरेदीवर एक लाख 42 हजार 353, उर्दू भाषेतील ग्रंथखरेदीवर 60 हजार 270 एवढा खर्च झाला होता. मात्र गेल्या तीन-चार वर्षांत ग्रंथखरेदी झाली नाही. महापालिकेने आता ग्रंथालयाच्या पुनरुज्जीवनाबरोबरच ग्रंथखरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी साडेतीन लाख रुपयांची तरतूदसुद्धा केली आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट