Parbhani

जिल्‍हा माहिती कार्यालय, परभणी"
महाराष्‍ट्रात सन 2000 पासून संत गाडगेबाबा  ग्रामस्‍वच्‍छता  अभियान राबविले जात होते.  त्‍याच्‍या अभूतपूर्व यशानंतर संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाच्‍या माध्‍यमातून  ग्रामीण  भागातील जनतेमध्‍ये स्‍वच्‍छतेच्‍या सवयी  वाढीस लागून  जीवनमान उंचावण्‍याच्‍या प्रयत्‍नांना लक्षणीय  यश  मिळाले. स्‍वच्‍छतेतून निर्मलतेकडे  अधिक गतीने  वाटचाल करण्‍यासाठी  संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाचे  1 एप्रिल 2012 पासून निर्मल भारत अभियान  असे नामकरण  करण्‍यात आले.  स्‍वच्‍छतेची  व्‍याप्ती  वाढविण्‍यासाठी   प्रोत्‍साहनपर अनुदानाच्‍या निकषांच्‍या  कक्षा विस्‍तारित  करण्‍यात आल्‍या.   निर्मल भारत अभियानात दारिद्रय  रेषेखाली  सर्व कुटुंबे, अनुसूचित जाती,  अनुसूचित जमाती, अल्‍पभूधारक शेतकरी, भूमिहिन शेतमजूर,  शारिरीकदृष्‍ट्या अपंग, महिला कुटुंबप्रमुख  आदी कुटुंबे यांना  वैयक्‍तिक स्‍वच्‍छतागृह  बांधून  वापर   सुरु केल्‍यास 4 हजार 600 रुपये इतके प्रोत्‍साहनपर अनुदान  दिले  जाते. इंदिरा  आवास योजनेतील घरांना शौचालय सुविधा नसेल व त्‍यांनी  सुविधा निर्माण  केल्‍यास  त्‍यांनाही  4 हजार 600 रुपये इतके प्रोत्‍साहनपर अनुदान  दिले जाते.
>  केंद्र शासनाच्‍या   ग्रामीण  विकास  मंत्रालयाने महात्‍मा  गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण  रोजगार  हमी योजनेंतर्गत हाती  घ्‍यावयाच्‍या  कामामध्‍ये  स्‍वच्‍छता  सुविधांचा समावेश  केलेला  आहे. त्‍यानुसार निर्मल भारत अभियानांतर्गत बांधण्‍यात येत असणा-या  वैयक्‍तिक शौचालये,  शालेय, अंगणवाडी व सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहांच्‍या  बांधकामातील कुशल व अकुशल मर्यादित खर्च महात्‍मा  गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण  रोजगार  हमी योजनेमधून  करण्‍याबाबतचा  शासन निर्णय झालेला आहे.  वैयक्‍तिक  शौचालयासाठी महात्‍मा  गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण  रोजगार  हमी योजनेंतर्गत 4 हजार 500 रुपये खर्च अनुज्ञेय  राहील.  मनुष्‍यबळासाठी महात्‍मा  गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण  रोजगार  हमी योजनेंतर्गत उपलब्‍ध करुन देण्‍यात येणारा  निधी हा  निर्मल भारत अभियानातून उपलब्‍ध  करुन  देण्‍यात  येणा-या  निधी व्‍यतिरिक्‍त  असतो.
>             परभणी  जिल्ह्यात स्‍वच्‍छता व  निर्मलतेची  चळवळ वाढावी  यासाठी  'निर्मलदीपावली-भाऊबीज उपक्रम'  राबविण्‍यात येत  आहे.  दीपावली भाऊबीजेच्‍या  निमित्‍ताने  बहिण  आपल्‍या  भावाला  ओवाळून  त्‍याच्‍या  दीर्घायुष्‍याची  प्रार्थना  करत  असते.  बहिणीने  ओवाळल्‍यानंतर  भाऊ  आपल्‍या  कुवतीप्रमाणे  बहिणीला  भेट वस्‍तू,  रोख  रक्‍कम इत्‍यादी  स्‍वरुपात  ओवाळणी  देत   असतो.  भाऊ-बहिणीच्‍या  पवित्र नात्‍याला   वृध्‍दींगत  करीत  असतांनाच  भावाने   बहिणीवर इतर  भेट वस्‍तूवर  खर्च  करण्‍यापेक्षा स्‍वच्‍छतेच्‍या  साधनांची   उपलब्‍धता    करुन  देण्‍यासाठी  ओवाळणी  द्यावी यासाठी  त्‍यांना  प्रवृत्‍त  करावे  या  हेतूने     1  नोव्‍हेंबर पासून 15  डिसेंबरपर्यंत विविध  उपक्रमांचे आयोजन करण्‍यात  येत  आहे. 
> परभणी जिल्‍हा  परिषदेंतर्गत एकूण 704  ग्रामपंचायती  असून सन 2013-14 च्‍या   वार्षिक कृती  आराखड्यात  जिल्‍ह्यातील एकूण  134 ग्रामपंचायतींचा  समावेश  करण्‍यात  आला  आहे.  निर्मल दीपावली -भाऊबीज उपक्रमासाठी  134  ग्रामपंचायतीपैकी  स्‍वच्‍छतेची  व्‍याप्‍ती  50  टक्‍क्‍यापेक्षा  कमी  व 300  पेक्षा जास्‍त कुटुंबसंख्‍या  असलेल्‍या  एकूण  45  ग्रामपंचायतींची निवड  करण्‍यात  आलेली  आहे. यामध्‍ये  गंगाखेड 6, जिंतूर 4, मानवत 7, पालम 3, परभणी 4, पाथरी 7, पूर्णा 3, सेलू 8 आणि सोनपेठ 3 एवढया ग्रामपंचायतींचा समावेश  आहे.  या  45 ग्रामपंचायतींमध्‍ये उपक्रम  कालावधीत विविध  कृती  कार्यक्रम  राबवून या  ग्रामपंचायती  प्राधान्‍याने शंभर टक्‍के  हागणदारीमुक्‍त  करण्‍याचा  निर्धार करण्‍यात  आला  आहे.  या  ग्रामपंचायतीच्‍या  क्षेत्रातील किमान  20 हजार 221 महिला भगिनींच्‍या घरात  शौचालय उपलब्‍ध  करुन  देण्‍याचे नियोजन  करण्‍यात  आले  आहे.  या गावांमध्‍ये  कलापथकाचे  कार्यक्रम घेऊन निर्मल  भारत अभियान,   शौचालय  बांधकाम,  स्‍वच्‍छतेचे  सहा  संदेश,  सांडपाणी  घनकचरा  व्‍यवस्‍थापन आदी  विषयी  जनजागृती  केली  जात  आहे.  ज्‍या  ग्रामपंचायती 100 टक्‍के हागणदारीमुक्‍त व  निर्मल  होतील  त्‍या ग्रामपंचायतींचे  सरपंच/उपसरपंच, ग्रामसेवक यांचा आणि ज्‍या  पंचायत समिती अंतर्गत 100 टक्‍के हागणदारीमुक्‍त व  निर्मल  होतील  त्‍या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी,  विस्‍तार अधिकारी यांचा विशेष सत्‍कार  करण्‍यात येणार आहे.  या व्‍यतिरिक्‍त इतर  सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सुध्‍दा  निर्मल  दीपावली  भाऊबीज  उपक्रम  राबविण्‍यात  येणार आहे.
> शौचालयांची  उभारणी करण्‍यातील  मुख्‍य अडचण कुटुंबप्रमुखाची  नकारात्‍मक  मानसिकता  हीच  आहे.  या  उपक्रमांतर्गत  या  कुटुंबप्रमुखांची  भेट  घेऊन शौचालयाचे  महत्‍त्‍व पटवून
> प्रत्‍यक्ष  शौचालय बांधकाम करण्‍यासाठी त्‍यांना प्रवृत्‍त केले  जाणार आहे.  जिल्‍ह्यातील  निम्‍म्‍याहून अधिक  कुटुंबाकडे शौचालयाची  सुविधा  उपलब्‍ध  नाही,  हे  वास्‍तव  नाकारण्‍यात  अर्थ  नाही.  ग्रामीण   स्‍वच्‍छतेचा  प्रश्‍न  सोडविल्‍याशिवाय  गावाच्‍या   समृध्‍दीचा  प्रवास  पूर्ण  होऊ  शकणार  नाही.  आपले  गाव समृध्‍द , स्‍वयंपूर्ण   आणि  संपन्‍न  होण्‍यासाठी सामूहिक प्रयत्‍नांची  आवश्‍यक  आहे.
> राजेंद्र  सरग,
> जिल्‍हा  माहिती  अधिकारी

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट